dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

कारंजा : समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून, वाहनातील सर्व प्रवाशांनी घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला.

कारंजा : समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून, वाहनातील सर्व प्रवाशांनी घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवणे कुटुंब अकोल्याकडे एमएच 34 बीएफ 1346 या कारने प्रवास करीत होते. समृद्धी महामार्गावरील कारंजा परिसरात वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत.

या अपघातात भास्कर जिवणे, रमेश जिवणे, लता जिवणे, आरती जिवणे आणि त्रिशा जिवणे (वय १०) यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याने जिवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः अवघ्या दहा वर्षांच्या त्रिशाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील शिवणी टोल प्लाझा येथील १०८ रुग्णवाहिकेचे पायलट रोहनकर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा तसेच ‘आस’ आपत्कालीन पथक, कारंजा (लाड) यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनातील मृतदेह बाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपासासह इतर बाबींचाही विचार केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

समृद्धी महामार्गावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात घडले असून, पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेगमर्यादेचे पालन, वाहनांची नियमित तपासणी आणि दीर्घ प्रवासादरम्यान चालकांनी आवश्यक विश्रांती घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे चंद्रपूर आणि अकोला परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून, जिवणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळीचे वातावरण निर्माण झाले असून, या दुर्घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top