दोन कारची समोरासमोर धडक ; शिक्षक ठार : सावंगी गोंधनखेडा फाट्याजवळील घटना

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील सावंगी गोंधनखेडा फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेंभुर्णी येथील शिक्षक विनोद बापुराव कळंबे (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, २२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. 

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील सावंगी गोंधनखेडा फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेंभुर्णी येथील शिक्षक विनोद बापुराव कळंबे (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, २२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गारखेडा तालुका जाफराबाद येथील रहिवासी व सध्या टेंभुर्णी येथे स्थायिक झालेले शिक्षक विनोद कळंबे हे काही कामानिमित्त जाफराबाद येथे गेले होते. ते आपल्या कारने  (एम‌एच २१ बीओ ९५९५)परत घराकडे निघाले होते. त्याचवेळी देऊळगाव राजा येथील आरोग्य सेवक रामेश्वर नामदेव नागरे हे देऊळझरी येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी त्यांच्या कारने (एमएच २८ बीडब्ल्यू ४३ २६) जात होते. दरम्यान सावंगी पाटील जवळ दोन्ही कारची समोरासमोर भीषण  धडक झाली. यात दोन्ही कारच्या दिशा बदलल्या. यामध्ये विनोद कळंबे यांची कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातानंतर जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी जालना येथे हलवले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच कळंबे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कळंबे हे एक आदर्श शिक्षक होते. ते सध्या तालुक्यातील नळविहीरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यांनी युगांदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजवंताना सामाजिक भान लक्षात ठेवून तत्काळ मदत करत होते. पत्रकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यातील शिक्षक व नागरीकांनी त्यांच्या टेंभुर्णी येथील निवासस्थानी एकच गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात आई,‌ पत्नी , भाऊ, मुलगा, मुलगी,  असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांचे ते लहान बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर मुळगावी गारखेडा येथे सोमवार, २३ मार्च रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची टेंभुर्णी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »