वाशिम : तालुक्यातील सावरगाव जिरे येथील शेतशिवारात विद्युत तारांमधील घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीने उभ्या गव्हाच्या पिकाला आग लागून सुमारे तीन ते चार एकरांतील गहू जळून खाक झाल्याची घटना शनिवारी (दि. ७) दुपारी घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

माहितीनुसार, रिठद रस्त्यालगतच्या शेतशिवारातून गेलेल्या वीजवाहिनीवरील लोंमकळलेल्या तारांमधील घर्षणामुळे ठिणगी पडली. ती काढणीस तयार असलेल्या गव्हाच्या पिकावर पडल्याने काही क्षणातच आगीने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले. त्यांनी पाण्याच्या साहाय्याने व इतर साधनांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. काही वेळाने आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत तीन ते चार एकरांतील गव्हाचे पीक जळून गेले. या आगीत ओंकार वानखेडे यांचा दीड एकर, दत्ता सोपान वानखेडे व सिताराम सोपान वानखेडे यांचा प्रत्येकी एक एकर गहू जळून खाक झाला, तर दामोदर काळे यांच्या अर्ध्या एकरातील गव्हाचे नुकसान झाले. तसेच श्रीराम सोपान वानखेडे यांच्या शेतातील हळदीसाठी बसविण्यात आलेली ड्रीप सिंचनाची पाईपलाईनही जळाली. घटनेची दखल घेऊन महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.