Formula of Mahavikas Aghadi: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला जाहीर केला.
मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला जाहीर केला.
वाय. बी. चव्हाण सेंटर येथे त्याच निमित्ताने बुधवारी शरद पवारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील होते. यावेळी महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांमध्ये 85-85-85 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. उर्वरित 18 मतदारसंघ महाविकास आघाडी मित्र पक्षांना सोडणार आहे. अर्थात कुणाला किती जागा देणार याबाबत चर्चा सुरु असल्याचे नाना पटोले आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.
१८ जागा मित्र पक्षाला देणार : पटोले
८५-८५-८५ म्हणजे २७० वर एकमत झाले आहे. १८ जागा आमच्या मित्र पक्षाला देणार आहोत. शेकाप आहे, समाजवादी पार्टी आहे. त्यांना काही जागा देणार आहोत. उद्या त्यांच्याशी बसून चर्चा करू. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार आहोत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.