चिखली : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत होवून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमडापूर पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव काकडे येथे घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून अमडापूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

अंकुश पाटील/चिखली : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत होवून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमडापूर पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव काकडे येथे घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून अमडापूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोरगाव काकडे येथील रहिवासी परमेश्वर प्रल्हाद साठे (वय ४५) यांच्या मुलाने रस्त्यावर दुचाकी उभी केली होती. याच दरम्यान आरोपी सागर सुनील काकडे याने आपल्या ट्रकने सदर दुचाकीला धडक दिली. या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वादाला तोंड फुटले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर हा वाद तुंबळ हाणामारीत रूपांतरित झाला. यावेळी आरोपी ज्ञानेश्वर गजानन काकडे व सुनील इनकराव काकडे यांनी साठे यांचा मुलगा, पत्नी व मुलगी यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान आरोपी रमेश गजानन काकडे याने हातातील चाकूने परमेश्वर साठे यांच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात साठे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी परमेश्वर साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी आरोपी सागर सुनील काकडे, ज्ञानेश्वर गजानन काकडे, सुनील इनकराव काकडे व रमेश गजानन काकडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५, ३५२, ३५१ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण टेकाळे करीत आहेत.
