Elections in doubt due to EVMs: निवडणूक आयोगाने मतपत्रिकांवरील निवडणुका सोडून ईव्हीएमचा वापर सुरू केल्यापासून निवडणुका संशयात अडकल्या आहेत. विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना भेटून मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने मतपत्रिकांवरील निवडणुका सोडून ईव्हीएमचा वापर सुरू केल्यापासून निवडणुका संशयात अडकल्या आहेत. विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना भेटून मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएम वापरण्याचे धोरण केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग राबवत असल्याने निवडणुकांच्या निकालासंदर्भात गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात मतपत्रिकांवर विधानसभेची फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत केली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतले आहेत. ईव्हीएम निवडणूक सदोष असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी जनपरिषदेने भूमिका मांडली. ‘महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. भाजपला १३२ जागा मिळाल्या असून राज्यातील विरोधी पक्षांना सभागृहात नेता निवडीपुरत्याही जागा नाहीत. या प्रकारची स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती. एकाही संस्थेने मतदानोत्तर चाचण्यात बहुमताचा अंदाज वर्तवला नव्हता. अगदी महायुतीमधील नेत्यांनाही अभूतपूर्व निकाल अपेक्षित नव्हता. हा निकाल अनाकलनीय असल्याची भावना राज्यभर व्यक्त होत आहे. निकालभोवती संशयाचे जाळे आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी ही निकोप लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करुन विधानसभेची फेरनिवडणूक घ्यावी’, असे ढोबळे म्हणाले.