वाशिम : वाशिम – अनसिंग – पुसद मार्गावर बुधवारी दुपारी शेगावहून उमरखेडकडे जाणाऱ्या एसटी बसचा सापळी फाट्यानजीक भीषण अपघात झाला. मोटारसायकल अचानक आडवी आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याखाली उलटली. या बसमध्ये एकूण ३७ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ बीटी ४३६२ क्रमांकाची शेगाव–उमरखेड एसटी बस वाशिम बसस्थानकावर थांबा दिल्यानंतर पुढील प्रवासासाठी निघाली होती. वाशिम–पुसद मार्गावरील सापळी फाट्याजवळ अचानक एका दुचाकीस्वाराने बससमोर येत मार्ग अडवला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने जोरात ब्रेक दाबत दिशाबदल केला, मात्र नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उलटली. अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काहींनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले तर काहींनी तातडीने पोलिसांना व एसटी प्रशासनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वाशिम आगाराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात मोठी जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, सध्या अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.