समृद्धी महामार्गावर कंटेनरची मेंटेनन्स वाहनाला धडक; ३ कामगार ठार, ३ जण गंभीर

करमाड : मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर दुरुस्तीचे काम करत असलेल्या पथकातील कामगारांना भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले. 

करमाड : मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर दुरुस्तीचे काम करत असलेल्या पथकातील कामगारांना भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, 6 मार्च रोजी दुपारी वडखा–नाथनगर शिवारात, चॅनल क्रमांक ४०६ जवळ घडली. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुल रामगीरी (२७), रा. परतूर, जि. जालना, विश्वेश्वर विश्वकर्मा (३२), रा. मध्य प्रदेश आणि गणेश सांडू कसारे (२७), रा. भिकापूर, ता. छत्रपती संभाजीनगर असे या अपघातात ठार झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर रामगोपाल रामपटेल (३७), रा. मध्य प्रदेश, ज्ञानेश्वर सोमीनाथ घोरपडे (२७), रा. पोखरी, ता. छत्रपती संभाजीनगर, शैलेन्द्र रॉय (मेंटेनन्स वाहन चालक) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मेघा इंजिनिअरिंग’ कंपनीचे सहा कामगार समृद्धी महामार्गावरील लोखंडी क्रॉस बॅरेलच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी कंपनीचा सर्विस ट्रक (एमएच ४० बीएम ८०४८) आणि जेसीबी (एमएच २० एफयू ३२०८) रस्त्याच्या कडेला उभी करून त्यांच्या सावलीत बसून दुपारचे जेवण सुरू केले होते. तसेच आवश्यक ते सेफ्टी बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. दरम्यान, जालन्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (एमएच ४० सीडी ५३५५) प्रथम सर्विस ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रक पुढे जाऊन जेसीबीवर आदळला. त्यानंतर कंटेनरने जेसीबीला सुमारे १०० फूट फरफटत नेल्याने जेवणासाठी बसलेले कामगारही त्यासोबत फरफटत गेले. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक किशोर चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन चव्हाण यांच्यासह पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, रविकिरण दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे हे करत आहेत.

दुपारचे जेवण ठरले जीवघेणे

मेघा इंजिनिअरिंग कंपनीचे सहा कामगार दुरुस्तीचे काम पूर्ण करून वाहनांच्या सावलीत बसून जेवण करत असताना भरधाव कंटेनरने धडक दिल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या अपघातात तीन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »