Akash Fundkar took oath as a minister : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा बहूप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुती सरकारच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपत घेतली. यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आकाश पांडुरंग फुंडकर यांची वर्णी लागली.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा बहूप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुती सरकारच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपत घेतली. यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आकाश पांडुरंग फुंडकर यांची वर्णी लागली. तत्पूर्वी मंत्रीपदासाठी जिल्ह्यातून जळगाव जामोदचे आ. संजय कुटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने पुन्हा धक्कातंत्र दाखवून दिले. आ. फुंडकर यांना मंत्रीपद मिळाल्याने आ. कुटे यांना देखील पक्षाची मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. सातपैकी सहा मतदार संघात महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने युतीची ताकद वाढली आहे. नवनिर्वाचित आमदारांमध्ये मलकापूरचे भाजप आ. चैनसुख संचेती हे सहाव्यांदा तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे पाचव्यांदा निवडून आले आहेत. खामगावमध्ये मंत्री आकाश फुंडकर यांनी विजयी हॅटट्रिक मारली. बुलढाणायत (शिंदे)शिवसेना आ. संजय गायकवाड आणि चिखलीत भाजपाच्या श्वेता महाले यांनी दुसऱ्यांदा विजय संपादित केला आहे. या सर्व आमदारांपैकी मंत्रीपदासाठी जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्या नावाची अधिक चर्चा होती. मात्र, भाजपाने पुन्हा धक्कातंत्र दाखवून दिले. आमदार आकाश फुंडकर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली असून, खामगावमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
राजकीय प्रवास ; भाजयुमो ते मंत्री
मंत्री आकाश फुंडकर यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. आकाश फुंडकर हे संघाचे द्वितीय वर्ग प्रशिक्षित असून ते सन २००२-०३ मध्ये अभाविपचे खामगाव नगरमंत्री होते. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष म्हणून २००३-०४ त्यांनी जबाबदारी सांभाळली असून सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला. नंतर ते भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सलग ते खामगावचे नेतृत्व करीत आहेत.
विजयाची हॅटट्रिक
२०१४ मध्ये भाजपने संधी दिल्यावर ते खामगावचे आमदार झाले. काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदा यांना पराभूत करून ते ‘जायंट किलर’ ठरले. यानंतर २०१९ आणि २०२४ मध्ये विजयी होऊन त्यांनी यंदा आमदारकीची हॅटट्रिक साधली. पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या या युवा नेत्याने यंदाही मंत्रिपदासाठी ‘लॉबिंग’ करण्याचे टाळले. दीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले आहे.
आ. कुटे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ?
सुरुवातीपासूनच मंत्रिपदासाठी जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांचा ‘पत्ता कट’ झाला नसून त्यांना मोठे पद मिळणार असल्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार कुटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.