जालना : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या हादरवून टाकणाऱ्या घटनेने महाराष्ट्र थरारला आहे. एका निष्पाप बालिकेवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या नराधमाविरोधात संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे.

जालना : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या हादरवून टाकणाऱ्या घटनेने महाराष्ट्र थरारला आहे. एका निष्पाप बालिकेवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या नराधमाविरोधात संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे. या निर्घृण कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी, 24 नोव्हेंबर रोजी गांधी चमन येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी त्या नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे व खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन करून संताप तीव्र संताप व्यक्त केला. नराधमाला फाशी द्या, चिमुकलीला न्याय द्या, गृहमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी अशा घोषणांनी गांधी चमन परिसर दणाणून गेला.
महिला काँग्रेसच्या नेत्या नंदा पवार यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करत राज्यातील महिला सुरक्षित नाहीत आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरत आहेत. या प्रकरणात त्वरित कडक कारवाई न झाल्यास महिला काँग्रेस व्यापक आंदोलन उभे करेल, असा कडक इशारा दिला. गुंजन चांदोडे यांनी प्रतीकात्मक काठी फिरवत शासनावर आपला रोष व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की, अशा अमानुष घटनांनंतरही सरकारच्या प्रतिक्रिया पोकळ आणि विलंबित का काही कार्यकर्त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या शांततेवरही टीका नोंदवली. त्यांनी म्हटले की, महिला अत्याचाराच्या वेळी आवाज उठवणाऱ्या नेत्यांची भाषा सरकारसमोर गप्प होते, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, पीडित बालिकेला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत संघर्ष सुरू राहील. प्रसंगी महिला काँग्रेसने चेतावणी दिली की आरोपीला फाशीची शिक्षा आणि पोलिसांकडून कडक तपास होईपर्यंत लढा सुरूच राहील. सरकारने प्रतिसाद दिला नाही, तर पुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल असे याप्रसंगी ठणकावून सांगितले.
आंदोलनात महिला कॉग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार, शहर जिल्हा सरचिटणीस गणेश चांदोडे, फकिरा वाघ, सुरज यलगंठवार,गुंजन चांदोडे, प्रतीक्षा खाडे, लक्ष्मी चांदोडे ,नूरजहाँ शेख, सुनंदा जायभाये, सुहासिनी कांबळे, सिंधु वाघ, जया आठवले,शारदा वाहुळे, खैरुनिशा सय्यद, राणी घायाळ, माया भगत, गीता तोषणीवाल व मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
