भोकरदन : बुलढाणा शहरातील आ. संजय गायकवाड यांच्याच कार्यकर्त्यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला आणि पैशांची लूट केल्याचा गंभीर आरोप करुन हल्लेखोरांवर भादंवि ३०७ आणि ३९२ या गंभीर कलमांखाली तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांना अटक करावी, या मागणीसाठी बुलडाणा येथील युवक मोहम्मद मोइनुद्दीन मोहम्मद यासीन हा बुलढाणा ते मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयावर पायी निघाला आहे. हा युवक शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी भोकरदन शहरात भीकमांगो आंदोलन करुन पुढे सिल्लोड येथे गेला आहे.

यासंदर्भात त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी मोहम्मद मोइनुद्दीन मोहम्मद यासीन रा. देऊळघाट, मदिना नगर, बुलढाणा येथील रहिवासी आहे. माझ्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला झाला आहे. हा हल्ला केवळ एक सामान्य गुन्हा नसून, तो सत्तेच्या दबावाखाली कायद्याची पायमल्ली झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय गायकवाड यांच्या दबावाखाली बुलढाणा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी (CEO) यांनी माझ्या उपजीविकेचे साधन असलेले दुकान ‘अतिक्रमण’च्या नावाखाली तोडले. इतकेच नाही तर, ती जागा त्यांच्याच कार्यकर्त्यांना नवीन दुकान बांधण्यासाठी दिली, जो माझ्यावर झालेल्या अन्यायाचा पहिला टप्पा होता. या प्रशासकीय गुंडगिरीचे पर्यवसान माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले. २० जुलै २०२५ रोजी आमदार गायकवाड यांच्या १० ते १२ कार्यकर्त्यांनी आणि इतर अनोळखी व्यक्तींनी मला अमानुषपणे मारहाण केली. त्यांनी माझ्या खिशातून अंदाजे १ लाख ८०,००० ते १ लाख ९०,००० हजार रुपये जबरदस्तीने लुटले. या घटनेची तक्रार देण्यासाठी मी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गेलो, परंतु राजकीय दबावामुळे पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने मला ११२ वर कॉल करून मदत मागावी लागली. असे असतानाही, पोलिसांनी माझी गंभीर तक्रार नोंदवली नाही, उलट हल्ला करणाऱ्यांनी दाखल केलेली खोटी तक्रार स्वीकारली आणि केवळ कमकुवत एनसी रिपोर्ट दाखल केली. बुलढाण्यात चालू असलेल्या दादागिरीला आळा घालण्यासाठी मी आता हे आंदोलन सुरू केले असल्याचे त्यांने सांगितले. या संपूर्ण संघर्षादरम्यान माझ्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी बुलढाणा जिल्हाधिकारी, बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी (CEO) आणि आमदार संजय गायकवाड यांची राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
बुलढाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना तक्रारी केल्या आहे. मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मी न्यायासाठी बुलढाणा ते पोलीस महासंचालक कार्यालयापर्यंत पायी प्रवास सुरू केला आहे. प्रवासात मी प्रत्येक गावात थांबून व्यवस्थेकडे भीक मागेल. या आंदोलनादरम्यान मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी माझी मागणी आहे. कारण बुलढाणा शहराचा आमदार आणि त्याचे कार्यकर्ते माझ्या जीवितासाठी धोकादायक आहेत. मुंबईत पोहोचल्यावर, मी तात्काळ न्याय मिळेपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करीन.
– मोहम्मद मोइनुद्दीन
आंदोलक युवक, बुलढाणा.