Krishibhoomi : मेहकर तालुक्यातील मादनी येथील अमोल मेटांगळे व पत्नी अर्पणा मेटांगळे या उच्चशिक्षित जोडप्याने शेतीतूनच प्रगती साधण्याचा ध्यास अंगिकारुन आपल्या जवळील 13 एकर शेतात नवनवीन प्रयोग राबवून उत्पन्नाचे स्त्रोत्र निर्माण केले आहेत. परिश्रमाच्या बळावर शेतातील बांधावर फळबाग लागवड करून हे शेतकरी आज लाखोंचे उत्पन्न घेत आहे.
विनोद सावळे / बुलढाणा : शेती व्यवसाय हा पूर्णता: निसर्गाच्या भरोशावर अवलंबून असल्याने आधुनिक युगात उच्चशिक्षित तरुणाई शेती कसण्यापेक्षा नोकरी, व्यवसाय व कामधंद्याच्या शोधात मुंबई, पुणे, नागपूर जातात. मात्र, मेहकर तालुक्यातील मादनी येथील अमोल मेटांगळे व पत्नी अर्पणा मेटांगळे या उच्चशिक्षित जोडप्याने शेतीतूनच प्रगती साधण्याचा ध्यास अंगिकारुन आपल्या जवळील 13 एकर शेतात नवनवीन प्रयोग राबवून उत्पन्नाचे स्त्रोत्र निर्माण केले आहेत. परिश्रमाच्या बळावर शेतातील बांधावर फळबाग लागवड करून हे शेतकरी आज लाखोंचे उत्पन्न घेत आहे.
मादनी येथील रेखाबाई व दिनकर संपतराव मेटांगळे यांचे सुपूत्र अमोल मेटांगळे एम ए. बीएड अर्थशास्त्र या विषयात पदव्यूत्तर तर पत्नी अर्पणा मेटांगळे बी.ए.डीएड आहेत. या उच्चशिक्षित दाम्पत्याने नोकरीच्या मागे न धावता शेतातच नवनवीन प्रयोग राबवत आहेत. अमोल यांच्याकडे 13 एकर शेती आहे. दरम्यान, त्यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. मात्र पाण्याची उपल्बधता नसल्याने फळबाग लागवड कशी करावी? असा प्रश्न समोर उभा ठाकला. परंतु हाताश न होता अमोल यांनी विहिर खोदली त्यानंतर बोअर घेऊन पाण्याचे स्त्रोत्र वाढविले. 2018 मध्ये मादनी येथील धरणावरुन शेतात पाणी आणले. वीजेचा तुटवडा दूर करण्यासाठी अटल सौर योजनेतून पंप व रोहित्र घेऊन अखंडीत वीज पुरवठा व नैसर्गिक सोलरच्या माध्यमातून पाणी उपसाची सोय केली. त्यानंतर शेताच्या बांधावर विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड केली. यामध्ये बहाडोली जांभूळच्या 25 कलम आठ वर्षापूर्वी बांधावर लागवड केली. त्यातून मागील तीन वर्षापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. यासह जांब या फळामध्ये तायवान पिंक पेरू 10, लखनौ 49 या जातीचे 10 असे एकूण 20 कलम, आंवळा पाच, सिताफळ, हनुमान फळ एन- 2, 15, आंब्याची 10 झाडे असून यामध्ये केशर, दशहरी, बारमाही, अंजीर, लिंबुनी व शेवगा कोहमतून या झाडाची लागवड केली असून त्यामध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढले आहे. बांधावरील या फळ बागेच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावर 13 एकरातील संपूर्ण लागवड खर्च निघत असल्याने शेती माल हा निव्वळ नफा राहत आहे.
पारंपरिक शेती करीत असताना लागवड खर्च निघणे अवघड आहे. मग शेतीत नवीन काही तरी प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी कृषी विज्ञान केंद्र कराडचे फळबाग तज्ञ निवृत्ती पाटील यांचे संत्रा लागवडीसाठी मार्गदर्शन लाभले. बांधावरील या फळबाग लागवडीतून शेती खर्च भागविल्या जातो. त्यामुळे शेती उत्पन्नातून वार्षिकाठी जवळपास लाखोंचे उत्पन्न मिळते.
-अमोल मेटांगळे, शेतकरी, मादनी.
हायटेक उपाययोजना!
शेतकरी अमोल मेटांगळे यांनी आपल्या शेतात व्यवस्थापनासाठी हायटेक उपाययोजना केल्या आहेत. संपूर्ण शेतातील फळबागांवर लक्ष ठेवणे तसे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी अमोल यांनी सोलर कॅमेऱ्याद्वारे शेतीची निगराणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे.