dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सुधारित वेतनश्रेणीसाठी दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप 

बुलढाणा :  सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने १७ नोव्हेंबरपासून राज्यभरातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात राज्यातील सुमारे ३४ हजार ५०० कर्मचारी सहभागी झाले असून, बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ६४० कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग नोंदविला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ६४० कर्मचाऱ्यांचा सहभाग 

बुलढाणा :  सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने १७ नोव्हेंबरपासून राज्यभरातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात राज्यातील सुमारे ३४ हजार ५०० कर्मचारी सहभागी झाले असून, बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ६४० कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग नोंदविला आहे.

   उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सन २०२३ मध्ये सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली. ही वेतनश्रेणी सन २००६ पासून काल्पनिक स्वरूपात, तर सन २०११ पासून प्रत्यक्ष स्वरूपात लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर सर्व दुय्यम न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भातील वेतनवाढीचा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने प्रस्तावाची छाननी करून आवश्यक दुरुस्त्यांसह जानेवारी २०२५ मध्ये शासनाकडे शिफारशीसह पाठविला. मात्र, जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटत आला तरी हा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. 

१३ तालुक्यातील कर्मचारी सहभागी 

बुलढाणा जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह १३ तालुक्यांतील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. दरम्यान, चिखली येथील दिवाणी न्यायालयातील ३४ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट-क संघटनेचे उपाध्यक्ष आनंद कारंजकर, सहकोषाध्यक्ष पंकज रावळे, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाले यांच्यासह आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण

या संपामध्ये लघुलेखक, गट-क व गट-ड कर्मचारी, बेलीफ, पुस्तक बांधणीकर, वाहनचालक, सफाई कर्मचारी आणि रात्रपाळी पहारेकरी अशा विविध संवर्गांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागाराच्या प्रांगणात एक दिवसीय साखळी उपोषण सुरू केले आहे.

वकील संघाचा पाठिंबा

बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा वकील संघाने जाहीर पाठिंबा दिला. अॅड. विजय सावळे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. “न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही सोबत आहोत,” अशी भूमिका त्यांनी  व्यक्त केली. यावेळी वकील संघाचे पदाधिकारी, विधीज्ञ उपस्थित होते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top