धावडा, वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई आणि आन्वा गावांचा समावेश; गावातच मिळणार तत्काळ पोलीस मदत

- गणेशराव खिस्ते
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार प्रमुख गावांमध्ये लवकरच पोलीस संरक्षण चौक्या सुरू होणार आहेत. धावडा, वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई आणि आन्वा या गावांचा यामध्ये समावेश असून, पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार या चौक्या सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासोबतच नागरिकांना गावातच तत्काळ पोलीस मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
या चारही गावांमध्ये पोलीस संरक्षण चौक्या सुरू झाल्यानंतर नागरिकांना प्रत्येक छोट्या-मोठ्या तक्रारीसाठी पारध पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. गावातील तंटे, वादविवाद, किरकोळ गुन्हे तसेच अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या चौक्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. प्रत्येक चौकीत कायमस्वरूपी एक ते दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे नियोजन असून, त्यामुळे गावात पोलिसांची नियमित उपस्थिती राहणार आहे. अनुचित घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देणेही शक्य होणार आहे.
पोलीस संरक्षण चौक्या सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अशा जागेचे भाडे शासनाकडून थेट जागामालकाला अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, नागरिक आणि जागामालकांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या या चार गावांतील नागरिकांना किरकोळ तक्रारी, गावातील भांडणे, वादविवाद तसेच अदखलपात्र गुन्ह्यांबाबत (एन.सी.) अर्ज देण्यासाठी पारध पोलीस ठाण्यात जावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा आर्थिक खर्चही होतो. मात्र, गावातच पोलीस संरक्षण चौक्या सुरू झाल्यानंतर प्राथमिक तक्रारी आणि अर्जांची दखल स्थानिक पातळीवर घेणे शक्य होणार आहे. परिणामी, नागरिकांच्या पोलीस ठाण्यातील वारंवारच्या फेऱ्या कमी होऊन वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
याशिवाय गावातच पोलीस यंत्रणेची उपलब्धता असल्याने नागरिक आणि पोलिसांमधील समन्वय अधिक वाढणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. चारही गावांमध्ये या चौक्या सुरू झाल्यानंतर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी सहकार्य करावे
“पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धावडा, वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई आणि आन्वा या प्रमुख गावांमध्ये पोलीस संरक्षण चौक्या सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना गावातच तत्काळ पोलीस मदत उपलब्ध होईल. किरकोळ तक्रारींचे निवारण स्थानिक पातळीवर करणे शक्य होणार असून, ग्रामस्थांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचणार आहे. या चौक्यांसाठी ग्रामपंचायतींनी शासकीय जागा अथवा स्थानिकांनी भाडेतत्त्वावरील जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे.”
– सचिन खामगळ, सहाय्यक पो.नि., पारध पोलीस ठाणे


