आ. अनुराधा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश; फुलंब्रीतील १८० तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १२०० शेतकरी होणार पुन्हा लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा लाभ मागील काही महिन्यांपासून बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत राज्याच्या कृषी आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, येत्या तीन महिन्यांत फुलंब्री तालुक्यातील १८० आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १२०० अशा एकूण १३८० शेतकऱ्यांचा किसान सन्मान निधीचा लाभ पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांमधील अनेक शेतकरी मागील काही महिन्यांपासून या योजनेच्या लाभापासून वंचित होते. शेतीसाठी लागणारा वाढता उत्पादन खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके तसेच इतर निविष्ठांच्या वाढत्या किमती लक्षात घेता किसान सन्मान निधीची आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात सादर केले होते. हे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, त्यावर कार्यवाही होऊन लाभ सुरू होण्यास विलंब होत होता.
आमदार चव्हाण यांनी राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र देऊन संबंधित शेतकऱ्यांच्या अभिलेखांची नियमांनुसार तपासणी करून पात्र लाभार्थ्यांचा निधी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यानंतर या प्रकरणाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी आणि तांत्रिक किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी केलेल्या या पाठपुराव्यामुळे १३८० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


