dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सुरेश देवकर यांच्या रुपाने शिक्षकांचा आवाज बुलंद करा : कपिल पाटील यांचे आवाहन 

अमरावती : गेल्या सहा वर्षांत विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे उमटला नाही. आता सभागृहात शिक्षकांचे प्रश्न ठामपणे मांडणारा आमदार आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी सुरेश देवकर यांच्या रुपाने शिक्षकांचा आवाज बुलंद करा, असे आवाहन शिक्षक भारतीचे नेते तथा माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केले. 

शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 अमरावती : गेल्या सहा वर्षांत विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे उमटला नाही. आता सभागृहात शिक्षकांचे प्रश्न ठामपणे मांडणारा आमदार आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी सुरेश देवकर यांच्या रुपाने शिक्षकांचा आवाज बुलंद करा, असे आवाहन शिक्षक भारतीचे नेते तथा माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केले. शिक्षक भारतीचे अमरावती शिक्षक मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुरेश गिताबाई बाबुराव देवकर यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या नामांकन मेळाव्यात कपिल पाटील बोलत होते.

या मेळाव्याला अमरावती शिक्षक मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुरेश गिताबाई बाबुराव देवकर यांच्यासह शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, संदिप तडस आदी उपस्थित होते. कपिल पाटील म्हणाले, सात शिक्षक आमदार आहेत; मात्र विधान परिषदेच्या नोंदी पाहिल्या तर अनेकजण गप्प राहिलेले दिसतात. गरिबांच्या शिक्षणाच्या बाजूने उभे राहण्याची बांधिलकी महत्त्वाची आहे. जाती-धर्माचा गर्व करण्यापेक्षा आपण गरिबांच्या बाजूने उभे आहोत, हे महत्त्वाचे आहे. सभागृहात बोलणारा माणूस पाहिजे. विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बी. टी. देशमुख यांनी सभागृहात एकटे असतानाही प्रभावी भूमिका बजावली. हीच परंपरा पुढे नेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. नामांकन मेळाव्यात शिक्षक भारतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिक्षक मतदारांची उपस्थिती होती. मेळाव्यातून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढण्याचा आणि सुरेश देवकर यांच्या विजयासाठी ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

‘देवकरांच्या बोर्डावर सावित्रीबाई आणि फातिमा शेख’

सध्याच्या निवडणुकीतील प्रचाराच्या पद्धतीवर भाष्य करताना कपिल पाटील यांनी उमेदवारांच्या प्रचारफलकांचा संदर्भ दिला. आता या निवडणुकीत साडी किंवा कपडा चालणार नाही. अमरावती शहरात अनेक उमेदवारांचे बोर्ड पाहिले; मात्र त्यावर सावित्रीबाई फुले किंवा फातिमा शेख यांचा फोटो दिसला नाही. सुरेश देवकर सरांच्या बोर्डावर मात्र सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांचे फोटो अगदी वरती आणि मोठ्या स्वरूपात आहेत,’ असे त्यांनी सांगितले. सुरेश देवकर निवडून आल्यानंतर ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता परिवर्तन घडवायचे : बेलसरे 

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे म्हणाले, २३ ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आजचा हा निर्धार कायम ठेवा. विधान परिषद शांत झाली आहे, कारण कपिल पाटील आज तिथे नाहीत. आता सुरेश देवकर यांच्या रूपाने आपला आवाज विधान परिषदेत पाठवायचा आहे. प्रत्येकाने किमान तीन शिक्षकांना मतदानासाठी सोबत आणण्याचा संकल्प करावा. यावेळी परिवर्तन घडवायचे आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ हा संघटनेचा मतदारसंघ आहे; तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. शिक्षकांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही बेलसरे म्हणाले.

शिक्षकांचे प्रश्न शिक्षक संघटनाच समजू शकते : सुरेश देवकर

उमेदवार सुरेश देवकर म्हणाले, शिक्षकांचे प्रश्न राजकीय पक्ष सोडवू शकत नाहीत. हे प्रश्न शिक्षक संघटनाच समजू शकते आणि सोडवू शकते. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी शिक्षक भारतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता गाफील राहून चालणार नाही; सावध आणि अलर्ट राहा. शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहा. उरलेल्या काळात प्रत्येकाने आपली जागा सोडू नये आणि आपल्या शाळेवर लक्ष ठेवावे. शिक्षक संघटना सहभागी होत असलेली ही शेवटची निवडणूक असेल; कारण यात आता राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. तुम्ही या ऐतिहासिक कार्याचे भागीदार होणार आहात. शिक्षक वाचवायचे आहेत, शाळा वाचवायच्या आहेत. प्रत्येक मताचे मूल्य आहे. सर्वाधिक संख्येने मतदान करा, असे आवाहन सुरेश देवकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top