शिरपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘एक नंबर’वरून गणेश मंडळ नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी जनार्दन बकाल (५५, रा. तिवळी) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी तिवळी बसस्थानकासमोर ही घटना घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी १५ जणांसह जगदंब गणेश मंडळातील इतर २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‘एक नंबर’वरून वाद; १५ जणांसह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा
शिरपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘एक नंबर’वरून गणेश मंडळ नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी जनार्दन बकाल (५५, रा. तिवळी) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी तिवळी बसस्थानकासमोर ही घटना घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी १५ जणांसह जगदंब गणेश मंडळातील इतर २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बकाल यांचे पुत्र दीपक बकाल यांनी रविवारी (२७ सप्टेंबर) दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, मिरवणुकीत अग्रेसर क्रमांकावर गणेश मंडळ ठेवण्यावरून जगदंब गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला. यावेळी बकाल यांना ट्रॅक्टरने धक्का देण्यात आल्याचे तसेच लोटालोटी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ते खाली कोसळले.
बकाल यांना उपचारासाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी अनुप लहाने, सचिन लहाने, संदीप लहाने, कैलास लहाने, विकास लहाने, पांडुरंग लहाने, केशव लहाने, दीपक खिल्लारी, प्रदीप लहाने, ज्ञानेश्वर लहाने, शुभम उ लहाने, वैभव लहाने, सुनील लहाने, निखिल लहाने व ललित शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे तपास करीत आहेत. प्रकरणात ई-साक्ष नोंदविण्यात आली असून आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.