नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी करणारे देशद्रोही असल्याचा हल्लाबोल करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर वोट चोरीचा आरोप केला. महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यात झालेल्या निवडणुकीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्ञानेश कुमारांनी देश विरोधात काम केले असून त्यांनी आता माफीचा साक्षीदार व्हावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

ज्ञानेश कुमार यांनी आता माफीचा साक्षीदार व्हावे
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी करणारे देशद्रोही असल्याचा हल्लाबोल करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर वोट चोरीचा आरोप केला. महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यात झालेल्या निवडणुकीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्ञानेश कुमारांनी देश विरोधात काम केले असून त्यांनी आता माफीचा साक्षीदार व्हावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
भाजप प्रत्येक निवडणूक जिंकते कशी? असा सवाल राहुल गांधी यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, मतचोरी करुन सरकार सत्तेत आले आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्यांना आज ना उद्या शिक्षा करणारच आहे. देशात ‘वोट चोरी’ आणि मतांची हेराफेरी सुरू आहे. मतदाराचे मत कुठे जाते हे तपासण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची असूनही त्यांनी प्रत्येक निवडणुकीत गोंधळ घातला. त्यामुळे हे देशविरोधी कृत्य आहे. संविधानावर झालेला हा हल्ला आहे. या प्रकरणी ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
पंतप्रधान मोदी, अमित शाह मुख्य सुत्रधार : राहुल गांधी
लोकशाहीच्या मुळावर उठलेल्या या कारस्थानाला ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत. निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे 2024 ची निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचे सिद्ध होते. याबाबत असलेला आमचा संशय खरा ठरला, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच लक्ष्य केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडले आहेत. या कटाचे मुख्य सूत्रधार पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग आणणार
विशेष सखोल पुनरावलोकनासंदर्भातील (एसआयआर) निवडणूक आयुक्तांमधील मतभेद उघड झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्या पदावरून हटवून त्यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेस आता संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये एक नवीन ठराव मांडण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची तयारी करत आहे. हा ठराव मंजूर करण्यासाठी संसदेत आवश्यक पाठिंबा मिळवणे ही एक स्वतंत्र घटनात्मक प्रक्रिया असेल. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया संविधानाच्या कलम ३२४(५) अंतर्गत विहित करण्यात आली आहे. यासाठी संसदेतील विहित कार्यपद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे.


