dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अडोळ प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार 

मालेगाव : बोराळा येथील अडोळ लघु सिंचन प्रकल्पातून रिसोड शहरासाठी पुन्हा पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या विरोधात बुधवारी (२३ सप्टेंबर) शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर गावात झालेल्या बैठकीत या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

रिसोडला नवीन पाइपलाइनला विरोध; आंदोलन छेडण्याचा बैठकीत निर्णय

मालेगाव : बोराळा येथील अडोळ लघु सिंचन प्रकल्पातून रिसोड शहरासाठी पुन्हा पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या विरोधात बुधवारी (२३ सप्टेंबर) शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर गावात झालेल्या बैठकीत या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

अडोळ प्रकल्पासाठी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. तसेच प्रकल्पातील पाण्यावर सिंचनासाठी अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप बसविले आहेत. मात्र, सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नसताना रिसोड शहरासाठी पुन्हा नवीन पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

रिसोड शहराला या प्रकल्पातून यापूर्वीच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय रिठद, शिरपूर यांसारख्या मोठ्या गावांनाही या प्रकल्पातून पाणी दिले जाते. त्यामुळे पुन्हा अतिरिक्त पाणी शहराकडे वळविल्यास स्थानिक शेतकऱ्यांच्या सिंचनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धरणासाठी जमीन देऊनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची स्थिती असताना पुन्हा शहरासाठी पाणी नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याने शेतकऱ्यांचा त्याला विरोध राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. अडोळ प्रकल्पातून रिसोड शहरासाठी नवीन पाइपलाइन होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

अडोळ प्रकल्पातून रिसोडला नवीन पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यास विरोध करण्यासाठी गावातील बैठकीत आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन निवेदन देण्यासह आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top