संजीव भोर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

समाजासाठी काम करताना स्वतःचे आयुष्य, कुटुंब आणि करिअर उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा नियोजनबद्ध पद्धतीने समाजहितासाठी योगदान देणे गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी सक्रिय राहावे, असे शिव प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : “ घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकार्य नको, तर कुटुंबाची जबाबदारी सांभाळून समाजासाठी योगदान द्या, ” असे आवाहन शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. पुणे येथे आयोजित शिवप्रहार संघटनेच्या तेराव्या वर्धापनदिन व पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. समाजकार्य करताना कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या भावना, जबाबदाऱ्या आणि भविष्यासोबतच सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवप्रहार संघटनेचा तेरावा वर्धापनदिन तसेच पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी शैलेश पाटील अहिरराव यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील आणि प्रदेश सरचिटणीस प्रशांत रामराव इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नियुक्ती सोहळा पार पडला.

शैलेश पाटील हे पूर्वीपासूनच विविध सामाजिक उपक्रम आणि आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी राहिले आहेत. सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने भूमिका घेत त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच ते धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यातील अनुभवाचा आणि संघटनात्मक कौशल्याचा शिवप्रहार संघटनेला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर शैलेश पाटील अहिरराव यांनी संघटनेची ध्येयधोरणे आणि सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष निलेश मदन पाटील, राज्य सरचिटणीस प्रशांत इंगळे तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शैलेश पाटील अहिरराव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

