अमरावती : शहरातील एका सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमरावती हादरले : रुग्णालयात आग; तीन नवजात बालकांचा मृत्यू
अमरावती : शहरातील एका सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले की, जिल्हा महिला रुग्णालयातील या घटनेनंतर इतर ३६ नवजात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पहाटे ३:१५ च्या सुमारास एनआयसीयूच्या ज्या विभागात अपरिपक्व आणि गंभीर आजारी बालकांना ठेवण्यात आले होते, तेथील एका व्हेंटिलेटरला आग लागली. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली आणि एनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या नवजात बालकांच्या पालकांनी या घटनेसाठी प्रशासनाला जबाबदार धरले. या घटनेतून बचावलेल्या एका मुलाच्या वडिलांनी सांगितले की, आग लागल्यानंतर रुग्णालयाचे सुरक्षा कर्मचारी आणि परिचारिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी नवजात बालकांना वाचवण्यासाठी मदत केली. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, त्यांनी या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी जखमींना सर्व आवश्यक वैद्यकीय मदतीचे आश्वासनही दिले.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.

