वाशिम : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने संपूर्ण बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले.

वाशिम : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने संपूर्ण बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घर, दागिने, गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली. मात्र यंदा सर्वाधिक आकर्षण ठरले ते वाहन बाजार. अकोला नाका परिसरातील दुचाकी शोरूममध्ये ऐरवी दररोज १० ते २० वाहनांची विक्री होत असताना गुढीपाडव्याच्या दिवशी हीच विक्री थेट १०० च्या घरात पोहोचली. शोरूममध्ये दिवसभर ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. त्याचबरोबर शहरातील इतर वाहन शोरूममध्येही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले, ज्यामुळे एकूणच वाहन बाजार तेजीत असल्याचे स्पष्ट झाले. व्यापाऱ्यांकडून गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध आकर्षक ऑफर्स, सवलती आणि विशेष योजनांची घोषणा करण्यात आल्याने ग्राहकांचा प्रतिसाद आणखी वाढला. कॅशबॅक, एक्स्चेंज ऑफर, सुलभ कर्ज योजना यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानल्या जाणाऱ्या या सणाला नवीन उपक्रम सुरू करण्याला विशेष महत्त्व असल्याने अनेक नागरिकांनी या दिवशी खरेदीचा मुहूर्त साधला. घरासमोर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करताना सोने-चांदी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दुचाकी-चारचाकी वाहन खरेदीला प्राधान्य देण्यात आले.
ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा अंदाज घेत वाशिममधील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ आकर्षक पद्धतीने सजवली होती. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा वाशिमच्या व्यापारासाठी उत्साहवर्धक ठरल्याचे चित्र दिसून आले.
सोने-चांदी दर गगनाला; खरेदी मर्यादित
गुढीपाडवा हा खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जात असला तरी यंदा वाढत्या महागाईमुळे सराफा बाजारात अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. सोने-चांदीच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर खरेदी गेल्याचे चित्र आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सराफा बाजारात मोठी उलाढाल होत असते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी दिसून आली. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्याने अनेक ग्राहकांनी खरेदी टाळल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा दैनंदिन ग्राहकांपेक्षा केवळ ३० ते ४० टक्के ग्राहक अधिक असल्याचे चित्र आहे, जे अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे सराफा बाजारात नेहमीसारखी गर्दी आणि उत्साह जाणवला नाही.
अवकाळी पावसामुळे खरेदीला ब्रेक
गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी सुमारे चार वाजेदरम्यान अचानक जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेतील खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. ऐन सायंकाळच्या गर्दीच्या वेळेतच पावसामुळे खरेदीला अचानक ब्रेक लागला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक सायंकाळी खरेदीसाठी बाजारात येतात. मात्र अवकाळी पावसामुळे अनेकांनी बाहेर पडणे टाळल्याने बाजारपेठेत अपेक्षित गर्दी झाली नाही. परिणामी व्यापाऱ्यांवरही त्याचा परिणाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
