पैठण : येथील खुल्या जिल्हा कारागृहाच्या अंतर्गत येणाऱ्या विहामांडवा येथील शेती शेडमध्ये बंदिवानांकडे अवैधरीत्या मोबाईल फोन आढळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे २० कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, कारागृह कर्मचाऱ्यानेच कैद्यांना मदत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य विभागाचे विशेष कारागृह महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार, शनिवार, ७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अतिरिक्त अधीक्षक सचिन साळवे यांच्या पथकाने विहामांडवा येथील शेती शेडवर अचानक छापा टाकला. या पथकाने बंदिवान राहत असलेल्या ठिकाणी झडती घेतली असता, तेथे मोबाईल फोन आणि इतर काही प्रतिबंधित साहित्य सापडले. कारागृह कर्मचारी सलमान शफिक शेख यांनी पदाचा गैरवापर केल्याचे समोर आले. पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी धाव घेऊन पंचनामा केला. वरिष्ठ तुरुंग अधिकारी दीपक लिंगाप्पा भोसले यांच्या फिर्यादीवरून शेख रफिक, रामू सोनवणे, आसिफ शेख, नागेंद्र कनोजिया, राजेश चौधरी, मंगेश गुमसते, शगीर शकील शेख, शिवाजी वडजे, मुजफ्फर माशुक अली शेख, कृष्णा पवार, आकाश शिंगे, शेख चांद पाशा, जयसिंग राठोड, आसिफ खान शब्बीर खान, धारासिंग बावरी, नरसिंग तळणीकर, जयसिंग पावरा, सुनील पाटील, मुस्तफा शेख आणि नीलेश महामुनी या २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.