जाफ्राबाद : सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांविरोधात आक्षेपार्ह, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरणाऱ्या विशाल पिंपळे या व्यक्तीविरोधात जाफ्राबाद पोलिस ठाण्यात सोमवार, २६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाफ्राबाद : सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांविरोधात आक्षेपार्ह, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरणाऱ्या विशाल पिंपळे या व्यक्तीविरोधात जाफ्राबाद पोलिस ठाण्यात सोमवार, २६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते. संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली होती.
विशाल पिंपळे या व्यक्तीने सोशल मीडियावर जाफ्राबाद तालुक्यातील पत्रकार “विकले गेले आहेत”, “दलाल आहेत” अशा प्रकारचे बिनबुडाचे व अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केल्याने केवळ तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अशा प्रकारे संपूर्ण पत्रकार बांधवांना बदनाम करण्याचा प्रयत्न हा अत्यंत निंदनीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हा व्यक्ती वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून खोटी माहिती पसरवणे, विशिष्ट घटकांविरोधात द्वेष निर्माण करणे व पत्रकारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हा प्रयत्न गंभीर स्वरूपाचा असून याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे पत्रकार बांधवांच्या मानसिक भावना दुखावल्या असून समाजात पत्रकारांविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना वेळीच कायदेशीर धडा शिकवणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी पत्रकारांनी एकमुखाने व्यक्त केले.
जोपर्यंत संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत पत्रकार संघटना शांत बसणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रकरणामुळे तालुक्यासह राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
