वाशिम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी त्यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज (दि. 23) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राजू पाटील राजेंची पत्रकार परिषदेत माहिती; वाशिम न्यायालयात प्रकरण दाखल
वाशिम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य चार जणांविरोधात भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज (दि. 23) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पाटील राजे यांनी सांगितले की, दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक माध्यमांसमोर माझ्याविरोधात गंभीर आरोप केले होते. वाशिममध्ये नकली नोटा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असूनही अटक झाली नाही तसेच शासन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी 3 जानेवारी 2026 रोजी वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस बजावून 15 दिवसांत खुलासा करण्यास व सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत ना खुलासा झाला ना माफी मागण्यात आली, असे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे 18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने हा दावा स्वीकारला असून प्रकरणाचा दावा क्रमांक 13/2026 आहे. यामध्ये विजय वडेट्टीवार यांच्यासह हरीश सारडा (रा. वाशिम), तेजराव इनामदार (रा. लोणी गवळी, जि. बुलढाणा) आणि पंकज इंगोले (रा. वाशिम) आणि एका वृत्तवाहिनीचा समावेश असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पाटील राजे म्हणाले की, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून याविरोधात न्यायालयात लढा देणार आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा जनतेची माफी मागावी.
यावेळी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक कार्याबाबत पारदर्शकता असल्याचे सांगत, खोट्या आरोपांना कायदेशीर मार्गानेच उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.
