Washim’s GMC named ‘Sant Sewalal Maharaj’: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असे करण्यात आले आहे.

वाशिम : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १३ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
या निर्णयानुसार वाशिम येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
शासन निर्णयात संत सेवालाल महाराज यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांनी समाजात समता, नैतिकता, व्यसनमुक्ती, परिश्रम आणि स्वावलंबनाचा संदेश दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजात जागृती आणि सदाचाराला चालना मिळाल्याने त्यांच्या नावाने संस्थेचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.या नामांतरामुळे बंजारा समाजाच्या आराध्य दैवताला शासकीय पातळीवर सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. संत सेवालाल महाराज यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय ओळखले जाणार असल्याने समाजात अभिमानाचे वातावरण असून, बंजारा समाज बांधवांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रशासकीय बदलांची जबाबदारी निश्चित
नामांतरानंतर संबंधित संकेतस्थळे, शासकीय अभिलेखे व नोंदवहींमध्ये आवश्यक बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई तसेच वाशिम येथील महाविद्यालय प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
