Dr. Jaisingrao Pawar Passes Away : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरूवारी पहाटे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरूवारी पहाटे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी गुरुवारी पहाटे आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, यानंतर अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती. शिवतेज या बंगल्यापासून डॉ. पवार यांची अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. यावेळी हजारो कोल्हापूरकरांनी इतिहासाच्या अभ्यासकाला श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना (सलामी) दिली, पोलीस धूनही सादर करण्यात आली. यावेळी डॉ. पवार यांच्या कुटुंबातील सदस्य प्रा. डॉ. अरुंधती पवार, डॉ. प्रा. मंजुश्री पवार, पृथ्वीराज पवार आणि रिया पवार उपस्थित होते. ‘डॉ. जयसिंगराव पवार अमर रहे’ अशा घोषणा देत हजारो कोल्हापूरवासीयांनी इतिहासाच्या या साक्षेपी अभ्यासकाला श्रद्धांजली अर्पण करून साश्रू नयनांनी अंतिम निरोप दिला.
तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला : मुख्यमंत्री
ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध झाला. अशा डॉ जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्वनिष्ठ, व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


