vehicle hits car in Murtijapur : स्थानिक भगतसिंग चौकात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने व्हॅगनार कारला जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात व्हॅगनारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

मूर्तिजापूर : स्थानिक भगतसिंग चौकात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने व्हॅगनार कारला जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात व्हॅगनारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
सविस्तर वृत्त असे की, १ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला देवरान येथील महारुद्र मारुती देवस्थानात सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर महिला मंडळींना घरी सोडण्यासाठी दिगंबर दीक्षित यांच्या मालकीची एमएच १२ एफके ०७७३ क्रमांकाची व्हॅगनार कार निघाली होती. चालक संदीप गावंडे (वय ५०) हे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मालिनी विजयकर (वय ६५) यांना हरियाणा नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोडण्यासाठी जात होते.
दरम्यान, रात्री साडेअकराच्या सुमारास भगतसिंग चौकातील चौफुलीवर दर्यापूरकडून कारंजाकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून जेष्ठ पत्रकार जयप्रकाश रावत आणि माजी उपाध्यक्ष अतिष महाजन घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेत रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. याचवेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल जावेद हसन घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या मदतीने चालक संदीप गावंडे यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काही वेळातच शहर पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग व्हॅनही घटनास्थळी दाखल झाली आणि मालिनी विजयकर यांना रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात डॉक्टर राठोड यांनी दोघांवर प्राथमिक उपचार केले. संदीप गावंडे यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असून मालिनी विजयकर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अस्थिरोग तज्ञांकडे पाठविण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या दोन्ही पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळी व रुग्णालयात हजर होत्या. सहकार्यासाठी प्रथम श्रीवास गणेश श्रीवास यांना बोलावण्यात आले तसेच रुग्णवाहिका चालक शेख इमरान यांनीही मदतकार्यामध्ये मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, धडक देणारे अज्ञात वाहन पसार झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


