dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कोषागारात रात्रभर कामकाज; ५९.३६ कोटींची देयके दाखल | Treasury Operates Overnight

Treasury Operates Overnight : आर्थिक वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्यासाठी आणि विविध देयके मार्गी लावण्यासाठी प्रशासनात गेल्या महिनाभरापासून मोठी धावपळ सुरू होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा कोषागार कार्यालयातही कामाचा ताण वाढला असून ३१ मार्च रोजी रात्री ३ वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवत तब्बल ५९ कोटी ३६ लाख रुपयांहून अधिक रकमेची देयके प्रक्रियेत आणण्यात आली.

३१ मार्चला ७०५ देयके प्राप्त; अधिकारी-कर्मचारी पहाटे ३ पर्यंत कामात

वाशिम : आर्थिक वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्यासाठी आणि विविध देयके मार्गी लावण्यासाठी प्रशासनात गेल्या महिनाभरापासून मोठी धावपळ सुरू होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा कोषागार कार्यालयातही कामाचा ताण वाढला असून ३१ मार्च रोजी रात्री ३ वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवत तब्बल ५९ कोटी ३६ लाख रुपयांहून अधिक रकमेची देयके प्रक्रियेत आणण्यात आली.

जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली १९ मार्चपासूनच ‘मार्च एण्ड’चे कामकाज हाती घेण्यात आले होते. विविध विभागांशी समन्वय साधून देयके वेळेत कोषागारात दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार ३१ मार्च रोजी सकाळपासूनच विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणात देयके प्राप्त होऊ लागली.  एकामागून एक देयके दाखल होत असल्याने कामकाजाचा वेग वाढत गेला. रोख आणि व्हीपीडीए अंतर्गत एकाच दिवशी तब्बल ७०५ देयके कोषागारात प्राप्त झाली. यामध्ये ५९ कोटी ३६ लाख २७ हजार ५२७ रुपयांच्या देयकांचा समावेश होता.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी विभाग, समाज कल्याण, तहसील, पंचायत समिती तसेच इतर विभागांकडून सहाय्यक अनुदान, वेतन, वैद्यकीय खर्च, प्रवास भत्ता आणि कार्यालयीन खर्च यांसारखी विविध देयके दाखल करण्यात आली होती. ही देयके ऑनलाइन प्रणालीद्वारे संबंधित खात्यांमध्ये वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व देयके प्रक्रियेत आणण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम केले. ३१ मार्च रोजी मध्यरात्रीनंतरही काम सुरूच राहिले आणि पहाटे ३ वाजेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सलग काम करूनही १ एप्रिल रोजी अधिकारी-कर्मचारी पुन्हा कार्यालयात हजर राहून पुढील कार्यवाही करताना दिसून आले. आर्थिक वर्षअखेरच्या या धावपळीत कोषागारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे देयकांची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत असून प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी घेतला आढावा

३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सायंकाळी जिल्हा कोषागार कार्यालयाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध देयकांची स्थिती तपासून प्रक्रियेची माहिती घेतली तसेच मुद्रांक साठ्याचीही पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, उपजिल्हा कोषागार अधिकारी भारत गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कामकाज सुरळीत व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत संबंधित कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले.

ना सुटी, ना रजा; १३ दिवस सलग कामकाज

जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी गेल्या १९ मार्चपासून सतत कर्तव्यावर आहेत. आर्थिक वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर १९ ते ३१ मार्चदरम्यान शासकीय सुट्ट्या, शनिवार व रविवारच्या नियमित सुट्ट्यांवरही निर्बंध घालण्यात आले होते. या कालावधीत सुटीच्या दिवसांमध्येही कामकाज सुरू ठेवण्यात आले. गेल्या १३ दिवसांत नियमित कामकाजाबरोबरच तब्बल ७ सुटीच्या दिवसांतही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडल्या. सततच्या या कामाच्या ताणातही अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहून देयकांची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडताना दिसून आले.

आर्थिक वर्षअखेरचा ताण मोठा असतो, पण देयकांचा ओघ अधिक असल्याने जबाबदारीही वाढली होती. त्यामुळे एकही फाईल प्रलंबित राहू नये, या भावनेतून आमच्या टीमने सलग दिवस-रात्र काम केले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या भेटीने आणि मार्गदर्शनामुळे सर्वांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला आणि कामाला अधिक गती मिळाली. 

— विजय जवंजाळ, जिल्हा कोषागार अधिकारी, वाशिम

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top