Tiger terror strikes again in Telhara : तालुक्यातील वारखेड शिवारात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सुभाष म्हसाये यांच्या शेतात घडलेल्या या घटनेत एका गायीचा आणि एका गोऱ्ह्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
नागरिकांचा रोष वाढला; तातडीने उपाययोजनांची मागणी

गोकुळ हिंगणकर / तेल्हारा : तालुक्यातील वारखेड शिवारात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सुभाष म्हसाये यांच्या शेतात घडलेल्या या घटनेत एका गायीचा आणि एका गोऱ्ह्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाच्या हालचाली दिसून येत होत्या. रात्रीच्या वेळी जनावरांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले असून ग्रामस्थ सतर्कतेत आहेत. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असली तरी वाघाला पकडण्यासाठी कोणतीही ठोस मोहीम हाती घेतली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. “वन विभाग नरबळीची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.परिसरातील शेतकरी व नागरिकांनी तात्काळ वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तसेच जनावरांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास नागरिक घाबरत असून भीतीचे सावट कायम आहे. दरम्यान, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर न राहता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी आता होत आहे.


