Bhokardan News : भोकरदन तालुक्यातील दोन जिगरी मैत्रिणींनी यशाला गवसणी घातली आहे. येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकत्र सराव करणाऱ्या दोन मैत्रिणींपैकी प्रियंका इंगळे हिची केंद्र सरकारच्या सीमा सुरक्षा दलामध्ये तर शीतल नाना मोरे हिची ‘महाराष्ट्र पोलीस’ दलात निवड झाली आहे.

भोकरदन : अत्यंत हलाखीची परिस्थिती, शेतकरी कुटुंब आणि समाजाचे टोमणे या सगळ्यांवर मात करत भोकरदन तालुक्यातील दोन जिगरी मैत्रिणींनी यशाला गवसणी घातली आहे. येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकत्र सराव करणाऱ्या दोन मैत्रिणींपैकी प्रियंका इंगळे हिची केंद्र सरकारच्या सीमा सुरक्षा दलामध्ये तर शीतल नाना मोरे हिची ‘महाराष्ट्र पोलीस’ दलात निवड झाली आहे. एकाच मैदानावर सोबत सराव करत असताना एकीने केंद्रात तर दुसरीने राज्यात मानाचा तुरा रोवून आपल्या मैत्रीचा खरा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
मैदानावर जुळली गट्टी : या दोघींची मैत्री साधारण दोन वर्षांपूर्वी भोकरदन शहरात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात झाली. दोघीही शेतकरी कुटुंबातील. परिस्थितीही सारखीच. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी दोघी मैदानावर आल्या आणि तिथेच त्यांच्या मैत्रीचे सूत जुळले. दोघींनी एकमेकींना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवणे, सराव करताना एकमेकींचा उत्साह वाढवणे आणि खचलेल्या वेळी धीर देणे, यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. परिस्थिती गरीब असली म्हणून काय झालं, स्वप्न मोठी बघायची आणि ती पूर्ण करायची, हाच एक निर्धार या दोन्ही मैत्रिणींच्या मनात होता. तालुक्यातील आसई येथील प्रियंका इंगळे हिचे तीन वर्षापुर्वी लग्न झाले. वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनातील जीद्द कमी झाली नाही, सासरी पतीची खंबीर साथ मिळाली. घरची जबाबदारी सांभाळत कठोर मेहनतीने अखेर बीएसएफमध्ये यशाला गवसणी घातली. शीतल नाना मोरे या तालुक्यातील क्षीरसागर गावातील. प्रियंकाची निवड झाल्यानंतर शीतल एकाकी पडली खरी, पण तिने आपला सराव सोडला नाही. मैत्रिणीच्या यशाने तिचा हुरूप आणखी वाढला. पोलीस भरतीच्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत शीतलने आपले कसब दाखवले. यवतमाळ जिल्ह्यातून तिने पोलीस शिपाई पदाला गवसणी घालत आपल्या कष्टाचे चीज केले. प्रियंकाची निवड झाली तेव्हा, तिच्या ‘आसई’ या गावी ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला होता. आपल्या मैत्रिणीचा झालेला सत्कार पाहून शीतलच्याही डोळ्यात पाणी आले होते. तोच आनंद आता दुणावला आहे. दोन दिवसांपुर्वी जाहीर झालेल्या निकालात शीतल मोरे हिचे नाव पोलीस यादीत झळकले आणि संपूर्ण मित्र -मैत्रिणी, कुटूंब, नातेवाईक आनंदाने न्हाऊन निघाले. तिची निवड होताच क्षीरसागर गावात आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी आणि ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत हा ‘निवड उत्सव’ साजरा करण्यात आला.


