Three bears spotted in Buldhana : बुलढाणा शहरातील मलकापूर रोड परिसरातील म्हाडा कॉलनीत, एल-बिल्डिंगच्या मागील बाजूस शुक्रवारी (२७ मार्च २०२६) रात्री तीन अस्वलांचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुलढाणा : शहरातील मलकापूर रोड परिसरातील म्हाडा कॉलनीत, एल-बिल्डिंगच्या मागील बाजूस शुक्रवारी (२७ मार्च २०२६) रात्री तीन अस्वलांचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे चित्रीकरण स्थानिक नागरिकांनी मोबाईल कॅमेर्यात केले असून हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उशिरा रात्रीच्या सुमारास एल-बिल्डिंगच्या मागील मोकळ्या जागेत तीन अस्वले फिरताना दिसली. काही रहिवाशांना बाहेर हालचाल जाणवल्यानंतर त्यांनी खिडकीतून पाहिले असता ही अस्वले परिसरात वावरताना आढळली. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखत या घटनेचे चित्रीकरण केले. या अनपेक्षित घटनेमुळे म्हाडा कॉलनीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला असून सतर्कता वाढवण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली असून संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अन्नाच्या शोधात ही अस्वले जवळच्या जंगल भागातून नागरी वसाहतीकडे आली असावीत, असा अंदाज व्यक्त होत आहे.


