Jalna Municipal Corporation : जालना शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीदरम्यान भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत केल्याच्या कारणावरून काँग्रेस पक्षाने आपल्या सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून यासंदर्भात बुधवार, 1 एप्रिल रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात आला.

भाजपला मदत करणे काँग्रेसच्या नगरसेवकांना पडले महागात !
जालना : महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीदरम्यान भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत केल्याच्या कारणावरून काँग्रेस पक्षाने आपल्या सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून यासंदर्भात बुधवार, 1 एप्रिल रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये फरूक सादिक तुंबीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अन्सारी, सुनील अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबीना मजीद पठाण आणि अनिल अशोक तिरखे यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले की, स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी या सातही नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाऊन भाजपाला उघडपणे मदत केल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठविण्यात आला होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पक्षनिरीक्षक व माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी जालना येथे संबंधित नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे प्रदेशाध्यक्षांनी ही कारवाई करत संबंधित सातही सदस्यांना पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे जालना शहरातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून आगामी राजकीय घडामोडींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


