Obscene conversation with student : सेवानिवृत्तीला आलेल्या शिक्षकाने तीन चिमुकल्या विद्यार्थीनींशी अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना बुधवार, ८ एप्रिल २०२६ सकाळी रोजी घडली. हे प्रकरण समजताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा गाठून मास्तरला चांगलेच बदडून काढले.

डोणगाव : सेवानिवृत्तीला आलेल्या शिक्षकाने तीन चिमुकल्या विद्यार्थीनींशी अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना बुधवार, ८ एप्रिल २०२६ सकाळी रोजी घडली. हे प्रकरण समजताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा गाठून मास्तरला चांगलेच बदडून काढले.
येत्या जून महिन्यात हा शिक्षक सेवानिवृत्त होणार होता. महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) असे या विकृत शिक्षकाचे नाव आहे. लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या महादेव आत्माराम मानतोडे या शिक्षकाने तिसऱ्या वर्गातील तीन मुलींचा विनयभंग केला. मागील काही काळापासून त्याच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत हे घाणेरडे कृत्य हा शिक्षक करीत होता. याविषयी कुणाला सांगितल्यास तो जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. यामुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना कोणाला सांगितली नाही. दरम्यान, ८ एप्रिल रोजी या विकृताने तीन मुलींसोबत लैंगिक चाळे केले. त्यांना कपडे उतरायला लावले. शिक्षकाच्या या कृत्याबद्दल मुलींनी आपल्या आई, वडिलांना ही घटना सांगितली. संतापलेल्या पालकांनी सकाळी दहा वाजता शाळा गाठून मास्तरची चांगलीच धुलाई केली.
घटनेबद्दलची माहिती समजताच डोणगाव पोलीस स्टेशनचे डोणगाव ठाणेदार अमरनाथ नागरे आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हेदेखील दाखल झाले. राखीव पोलीस दलसुद्धा पोहोचले. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय अधिकारी खाडे यांनी पालकांची समजूत काढली. यावेळी आरोपी शिक्षकाला डोणगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. येत्या तीन महिन्यांनी जूनमध्ये हा शिक्षक सेवानिवृत्त होत आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्याने विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


