जालन्यात ठिंबक सिंचन कंपनीला भीषण आग; एमआयडीसी फेज-३ हादरले | चार अग्निशमन गाड्यांच्या मदतीने दोन तासांत आग आटोक्यात

जालना :  उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील फेज-३ परिसरात गुरुवार, १२ फेब्रुवारी दुपारी भीषण आग लागून संपूर्ण परिसर हादरून गेला. ठिंबक सिंचन साहित्य निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत अचानक भडका उडाल्याने आगीचे प्रचंड लोट आणि काळ्या धुराचे ढग दूरवरूनही दिसत होते. काही वेळातच परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

जालना :  उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील फेज-३ परिसरात गुरुवार, १२ फेब्रुवारी दुपारी भीषण आग लागून संपूर्ण परिसर हादरून गेला. ठिंबक सिंचन साहित्य निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत अचानक भडका उडाल्याने आगीचे प्रचंड लोट आणि काळ्या धुराचे ढग दूरवरूनही दिसत होते. काही वेळातच परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या उत्पादन विभागातून अचानक धूर निघू लागला. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. कंपनीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व रसायनयुक्त साहित्य असल्याने आग वेगाने पसरली. परिस्थिती ओळखून कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर पळ काढत अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे ८० लिटर विशेष अग्निशमन रसायनांचा वापर करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.

 दोन तासांच्या तीव्र संघर्षानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य, तयार माल व महत्त्वाची यंत्रसामग्री जळून खाक झाली होती. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अधिकृत नुकसानभरपाईचा अंदाज अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

आगीचे कारण अस्पष्ट 

या भीषण आगीमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्टसर्किट, रासायनिक प्रतिक्रिया की सुरक्षेतील निष्काळजीपणा? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. औद्योगिक परिसरातील अग्निसुरक्षा उपाययोजनांवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कंपनीत फायर सेफ्टी सिस्टम कार्यरत होती का? नियमित फायर ऑडिट झाले होते का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

जीवितहानी टळली; सतर्कतेचा इशारा

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना धोक्याची घंटा ठरली आहे. एमआयडीसी परिसरातील इतर उद्योगांनाही तत्काळ अग्निसुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

अग्निशमन दलाचे प्रयत्न

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अग्निशमन अधिकारी एस. बी. दराडे, फायरमन संतोष काळे, नितेश ढाकणे, रविनाथ बनसोडे, जॉन गवळी, सादिक अली, तसेच चालक विनायक चव्हाण, पंजाबराव देशमुख व संजय हिरे यांनी प्राणपणाने प्रयत्न करत मोठी दुर्घटना टाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »