dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समृद्धीवर मदतीचा अभाव; अपघातात चालकाचा मृत्यू | Driver Dies in Accident

Driver Dies in Accident : समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉर्नरजवळ (लोकेशन क्रमांक १९७) शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्ग प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकेशन क्रमांक १९७ जवळ अपघात; हेल्पलाईनवर संपर्क करूनही प्रतिसाद नाही

कारंजा : समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉर्नरजवळ (लोकेशन क्रमांक १९७) शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्ग प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीबी ०५ एपी ९२४२ क्रमांकाचा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात असताना रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास डिझेल पाईप फुटल्याने तो १०० किमी वेगाच्या लेनमध्येच बंद पडला. अडचण लक्षात येताच चालकाने तातडीने समृद्धी महामार्ग हेल्पलाईनवर संपर्क साधत मदत मागितली व बॅरिकेट लावण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पहाटेपर्यंत कोणतीही मदत घटनास्थळी पोहोचली नाही.  दरम्यान, अपघात टाळण्यासाठी चालक स्वतःच रस्त्यावर उतरून इतर वाहनांना हाताने इशारे देत होता. त्यामुळे काही मोठे अपघात टळले; मात्र सकाळी सुमारे ५ वाजता एमएच १४ एचयू ३२९२ क्रमांकाच्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित चालक व क्लिनर यांनी पुन्हा हेल्पलाईनवर संपर्क साधला. तरीही बॅरिकेट किंवा आपत्कालीन मदत वेळेत पोहोचली नाही. अखेर कारंजा ग्रामीण पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा व समृद्धी महामार्गाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.  जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, संबंधित ठेकेदाराने “क्रेनमध्ये डिझेल नाही” असे कारण देत विलंब केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. वेळेत मदत मिळाली असती तर चालकाचा जीव वाचला असता, असा संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात फुलचंद यादव (वय ३९, रा. आजमगड, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला असून अरविंद यादव (वय २९) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गावर वारंवार नादुरुस्त वाहने वेगवान लेनमध्ये उभी राहत असून, त्या ठिकाणी वेळेत बॅरिकेट न लावल्यामुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top