जीवनात परमार्थ, व्यवहारात चांगल्या माणसाची संगत आवश्यक :  खामखेडा सप्ताहात हभप विष्णु महाराज सास्ते यांचे विवेचन

जाफ्राबाद : प्रत्येकाने जीवनात परमार्थ व व्यवसाय आणि व्यवहारात चांगल्या माणसाची संगत करणे आवश्यक आहे, असे विवेचन हभप विष्णु महाराज सास्ते यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थित भाविकांना केले.

जाफ्राबाद : प्रत्येकाने जीवनात परमार्थ व व्यवसाय आणि व्यवहारात चांगल्या माणसाची संगत करणे आवश्यक आहे, असे विवेचन हभप विष्णु महाराज सास्ते यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थित भाविकांना केले.

 तालुक्यातील खामखेडा येथील श्री संत गजानन महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठेला 12 वर्षे पूर्ण होत आहे. या तपपूर्तीच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम भागवत सप्ताह सुरू आहे. यंदा या सप्ताहात विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रविवार, 8 फेब्रुवारी रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाची हभप विष्णु महाराज सास्ते यांच्या काल्याच्या कीर्तनाने अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. सप्ताहाच्या सातव्या व अंतिम दिवशी कीर्तनसेवा सास्ते महाराज यांनी केली. आपल्या कीर्तनातून त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित करण्याची आवश्यकता, यावर सखोल विचार मांडले. संत आणि देव यामधील सूक्ष्म फरक उलगडून सांगताना त्यांनी उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले. एक वेळ देव माफ करू शकतो, पण संत आपल्याला माफ करू शकत नाही, असे परखड विधान त्यांनी आपल्या प्रवचनातून केले. हनुमंत रायाच्या भक्तीचे महत्त्व सांगताना त्यांनी प्रत्येक गावात असलेल्या हनुमान मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठेचे वर्णन व कौतुक केले. हनुमंत रायाची भक्ती केल्यास श्रीरामाचे दर्शन होते, भक्तिमार्ग स्वीकारत संसाराचा गाडा समर्थपणे चालवावा, मुलांवर चांगले संस्कार करावेत, असा संदेश देत त्यांनी खामखेडा येथील ग्रामस्थांचे कौतुक केले, तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. सप्ताहकाळात खामखेडा गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत अन्नदानाची सेवा केली. सातही दिवस महाराजांच्या मुखातून रसाळ हरिकथेचे श्रवण भक्तांना लाभले. तसेच विविध मान्यवर कीर्तनकारांच्या मुखातून हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »