जाफ्राबाद : तालुक्यात टेंडरच्या (निविदा) नावाखाली अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून, भर दिवसा तसेच रात्रंदिवस हा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्णा नदीच्या पात्रातून तसेच खडक पूर्णा धरणाच्या पाण्यातून बोटींच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या वाळू उपसा केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, एकाच पावतीवर तब्बल पाच दिवस वाळू उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे.

वाळू वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर हायवा वाहनांचा वापर केला जात असून, ही वाहने दिवस-रात्र रस्त्यावरून धावल्याने सर्वसामान्य प्रवाशांना व वाहनधारकांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. दरम्यान, खामखेडा पाटी ते हिवरा काबली या रस्त्याचे उद्घाटन आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असतानाच अवजड वाळू व मुरम वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर झीज होत आहे. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे नुकसान होत असल्याने संबंधित ठेकेदारासही काम करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना उडणाऱ्या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, शेतातील पिकांवरही धुळीचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना धुळीच्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी रस्त्यालगत राहणाऱ्या शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. जाफ्राबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी, कुंभारझरी, आळंद, हनुमंत खेडा, बोरखेडी, देऊळझरी, नळविहीरा, खामखेडा, देऊळगाव उगले, गारखेडा, डावरगाव देवी, बोरखेडी गायके, धामणा आदी गावांच्या हद्दीत तसेच पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अवैध वाळू उपसा त्वरित थांबवावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा, प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.