शेगाव : भाव भक्तीची आज ही सुमने घेऊनी मी आलो तुझीया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो ||म्हणत विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले संत नगरी शेगाव येथे आज श्री संत गजानन महाराजांच्या 148 वा प्रकट दिन लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

अनुप गवळी | शेगाव : भाव भक्तीची आज ही सुमने घेऊनी मी आलो तुझीया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो ||म्हणत विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले संत नगरी शेगाव येथे आज श्री संत गजानन महाराजांच्या 148 वा प्रकट दिन लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रातील तसेच देशातील लाखो भाविकांचे आराध्य असलेले श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त संत नगरी शेगाव जय गजानन श्री गजानन च्या नामघोषाने दुमदुमली होती. आज आठ फेब्रुवारी रोजी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त संत गजानन महाराज संस्थान मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. पहाटे चार वाजेपासूनच असंख्य भक्तांनी श्रींच्या मंदिरात समाधीचे दर्शन घेतले. प्रकट दिनानिमित्त शेगाव मध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून सुमारे 700 च्या वर भजनी दिंड्या दाखल झाल्या होत्या. भजनी दिंड्यासह हजारो वारकरी सुद्धा श्रींच्या नामाचा गजर करत प्रकट दिन उत्सवात सहभागी झाले होते. शेगावात दाखल झालेल्या लाखो भाविकांसाठी संस्थांतर्फे श्रींच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हा उत्सव भाविक भजन, कीर्तन करत मोठ्या श्रद्धेने गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा करत असतात. भाविकांची गर्दी बघता आज शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान कडून भविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दुपारी श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा
श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त श्री संस्थांकडून दुपारी 2:30 वाजता श्रींच्या रजत मुखवट्याची नगरपरिक्रमा काढण्यात येणार आहे. ही नगरपरिक्रमा संपूर्ण शहरातून निघणार असून या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी आणि भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी सहा वाजे दरम्यान नगर परिक्रमा करून या पालखी सोहळ्याचा पुन्हा गजानन महाराज मंदिरात समारोप होणार आहे. तसेच 9 फेब्रुवारी रोजी सकाळी काल्याचे किर्तन होऊन या प्रकट दिन सोहळ्याचा समारोप होणार आहे.
