the Strait of Hormuz : इराणने भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराक यांसारख्या मित्र देशांना व्यावसायिक जलवाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी ही घोषणा केली.

तेहरान/नवी दिल्ली : इराणने भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराक यांसारख्या मित्र देशांना व्यावसायिक जलवाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी ही घोषणा केली.
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यापासून जागतिक तेल आणि वायूच्या किमती वाढल्या आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी हा पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यानचा एक अरुंद सागरी मार्ग आहे, ज्यातून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) वाहून नेले जाते. पश्चिम आशिया हा भारताच्या ऊर्जा खरेदीचा एक प्रमुख स्रोत राहिला आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीनुसार, अराघची म्हणाले, आम्ही काही मित्र देशांना (होर्मुझच्या सामुद्रधुनीतून) मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली आहे. आम्ही चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान यांना मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की, इराणच्या शत्रू देशांच्या जहाजांना या जलमार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
तुर्कीच्या तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला
रशियाहून कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या तुर्कीच्या ‘अल्टुरा’ या मालवाहू जहाजावर गुरुवारी पहाटे काळ्या समुद्रात नौदल ड्रोनद्वारे भीषण हल्ला करण्यात आला. बोस्पोरस सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन रूम आणि ब्रिजचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, जहाजावरील सर्व २७ तुर्की खलाशी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. तुर्कीचे परिवहन मंत्री अब्दुलकादिर उरालोग्लू यांनी माहिती दिली की, हे जहाज १,४०,००० टन कच्चे तेल घेऊन जात असताना बॉस्फोरसच्या उत्तरेला साधारण १४ सागरी मैलांवर हा स्फोट झाला.
इराणचे नौदल कमांडर हल्ल्यात ठार
जेरुसलेम: इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी हे बंदर अब्बास येथे अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत, असा दावा इस्रायली अधिकार्यांच्या हवाल्याने इस्रायली प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, या हल्ल्याबाबत इराण किंवा इस्रायली लष्कराकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्यासाठी तांगसिरी प्रामुख्याने जबाबदार होते.


