Distribute Kerosene Due to LPG Shortage : राज्यात एलपीजी गॅसच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन म्हणून केरोसीन वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबई : राज्यात एलपीजी गॅसच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन म्हणून केरोसीन वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ३,७४४ किलोलीटर केरोसीन मंजूर केले असून हे वाटप मार्च-एप्रिल २०२६ या कालावधीपुरतेच तात्पुरते असणार आहे.
शासन आदेशानुसार, प्रत्येक कुटुंब किंवा शिधापत्रिकाधारकाला ३ लिटर केरोसीन एकदाच देण्यात येणार आहे. अंतोदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य दिले जाणार असून, उपलब्धतेनुसार इतर श्वेतपत्रिका धारक, शिधापत्रिका नसलेली कुटुंबे तसेच स्थलांतरित मजूर यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
केरोसीनचे वितरण रास्तभाव दुकाने व अधिकृत विक्रेत्यांमार्फत करण्यात येणार आहे. वितरण सुरू झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत संपूर्ण साठा उचलणे बंधनकारक असून, न उचललेला केरोसीन पुढे हस्तांतरित केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तेल कंपन्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण साठ्यापैकी सुमारे ८५ टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गैरवापर रोखण्यासाठी जिल्हास्तरावर संयुक्त तपास पथके स्थापन करून देखरेख ठेवण्याचे आदेश आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्यात आले आहे. या योजनेद्वारे राज्यभरातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे.


