Cough syrup smuggling : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित कफ सिरप आणि गोळ्यांची तस्करी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सय्यद अखिल सय्यद काजी हुसैनी (३५ वर्ष), रा. सिल्कमिल कॉलनी याला गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले.

छत्रपती संभाजीनगर : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित कफ सिरप आणि गोळ्यांची तस्करी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सय्यद अखिल सय्यद काजी हुसैनी (३५ वर्ष), रा. सिल्कमिल कॉलनी याला गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. नशेसाठी प्रतिबंधित केलेले कफ सिरपच्या बाटल्या त्याने गुजरात येथून चार दिवसापूर्वी त्याने मागविला होता. तसेच सदरचा साठा पोलिसांच्या धास्तीने त्याने मेव्हण्याच्या घरात लपवून ठेवला होता
प्रतिबंधित कफ सिरप आणि गोळ्यांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हेशाखा पोलिसांनी सय्यद अखिल सय्यद काजी हुसैनी याच्यासह शेख आवेज शेख नवाब (२३ वर्ष), रा. सिल्क मिल कॉलनी) आणि शेख अरबाज शेख फिरोज (२६ वर्ष), रा. अबरार कॉलनी यांना अटक केली. त्यांच्याकडून १९० बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी शहानुरमिया दर्गा चौकात गुजरातवरून नशेच्या औषधांचा साठा आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संदीप काळे व अर्जुन कदम यांनी संशयितांचा शोध सुरू केला. सोमवार, 6 एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अखिल व आवेज उरलेला साठा विकण्यासाठी निघणार असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकला. अबरार कॉलनीतील एका घरात प्रवेश करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले, जिथे १९० बाटल्यांचा साठा मिळून आला.


