जालना : वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जालना शहरातील मंगळ बाजार चौकात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने जालना शहर पुन्हा एकदा हादरले आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जुन्या वादातून थरारक घटना; एक संशयित आरोपी ताब्यात
जालना : वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जालना शहरातील मंगळ बाजार चौकात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने जालना शहर पुन्हा एकदा हादरले आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी उत्तर रात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास मंगळ बाजार चौक परिसरात ही घटना घडली. शाहेद सगीर शेख (रा. जालना) या तरुणावर जुन्या वादातून संशयित राहील कलीम शेख ( रा. मंगळ बाजार, जालना ) याने धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात शाहेद गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर शाहेद याला तातडीने उपचारासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून, रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
मयत शाहेद शेख यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहील कलीम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली.
दरम्यान, जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, मारहाण, टोळीयुद्ध व दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. भरवस्तीत, मध्यरात्री घडलेल्या या हत्येमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.