Ambulance collides with truck on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक १७६ जवळ शुक्रवारी सकाळी ८.१० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

धडकेनंतर रुग्णवाहिकेला आग, मोठा अनर्थ टळला
कारंजा : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक १७६ जवळ शुक्रवारी सकाळी ८.१० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव रुग्णवाहिकेने समोर चालत असलेल्या आयशर ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला.

माहितीनुसार, रुग्णवाहिका (क्रमांक डब्लूबी ७३ जी ९१९२) ही कोलकाता येथील रुग्णाला मुंबई येथे सोडून पुन्हा मुंबईहून कोलकात्याकडे परत जात होती. दरम्यान चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर चालत असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात रुग्णवाहिका चालक अबी सरकार (वय ३६), बापी रॉय (वय ४१, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) व रवींद्र जाधव (वय ५०, रा. नाशिक) जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की धडकेनंतर रुग्णवाहिकेला तत्काळ आग लागली. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र समृद्धी महामार्गावरील अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट होण्याचा धोका टळून मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच १०८ समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका पथकातील पायलट रवी उर्फ सोनू शिंदे व डॉ. आशुतोष मुठाळ यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना प्राथमिक उपचार देऊन कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. घटनास्थळी एचएसपी पोलीस दल, समृद्धी महामार्ग अग्निशामक दल तसेच विविध रुग्णवाहिका पथकांनी तत्परतेने मदतकार्य केले. या अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


