शारा : शिवणी जाट येथील धरणाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, अज्ञात व्यक्तीने धरणाचे दरवाजे उघडल्याची घटना 9 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे व्हीलही चोरीला गेल्याने दरवाजे बंद करण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पर्यायी व्यवस्था करुन रात्री एक वाजता धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शारा : शिवणी जाट येथील धरणाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, अज्ञात व्यक्तीने धरणाचे दरवाजे उघडल्याची घटना 9 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे व्हीलही चोरीला गेल्याने दरवाजे बंद करण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पर्यायी व्यवस्था करुन रात्री एक वाजता धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
महसूल विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडळ अधिकारी विजय पोफळे, ग्राम महसूल अधिकारी मंदार तनपुरे यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित राहून धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. व्हील चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मंडळ अधिकारी विजय पोफळे आणि ग्राम महसूल अधिकारी मंदार तनपुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नवीन व्हील उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नवीन व्हीलचा तातडीने बंदोबस्त करून ते धरणाच्या यंत्रणेला बसवण्यात आले. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून प्रयत्न केल्यानंतर अखेर रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास धरणाचे दरवाजे बंद करून पाणी थांबवण्यात आले. त्यामुळे धरणातून होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यश आले. यावेळी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडळ अधिकारी विजय पोफळे, ग्राम महसूल अधिकारी मंदार तनपुरे, सरपंच, पोलीस पाटील, राजू भाऊ गवळी, चंद्रकांत बरले, प्रवीण बरले यांच्यासह महसूल विभागाचे पथक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संकटकाळी सर्वांनी समन्वयाने काम केल्यामुळे वेळेत पर्यायी व्यवस्था करून धरणाचे दरवाजे बंद करणे शक्य झाले. मात्र, या घटनेमुळे धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणाचे दरवाजे नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने उघडले? दरवाजे बंद करण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे व्हील चोरीला कसे गेले? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. धरणासारख्या महत्त्वाच्या जलसाठ्याच्या ठिकाणी आवश्यक यंत्रसामग्री सुरक्षित ठेवणे आणि नियमित देखरेख करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. मात्र, धरणाचे दरवाजे उघडे राहणे आणि ते बंद करण्यासाठी आवश्यक असलेले व्हीलच चोरीला जाणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पाटबंधारे विभागाने शिवणी जाट धरणावर कायमस्वरूपी एका जबाबदार कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


