मासरूळ : धाड बसस्थानकातून महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चार महिलांचा पोलिसांनी अवघ्या तासाभरात छडा लावला. आरोपी महिला जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील असून चोरीस गेलेले दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.

मासरूळ : धाड बसस्थानकातून महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चार महिलांचा पोलिसांनी अवघ्या तासाभरात छडा लावला. आरोपी महिला जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील असून चोरीस गेलेले दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
धाड येथील बसस्थानकात 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास रेखा संजय विसपुते यांच्या बॅगेतून सोन्याची मणी-मंगळसूत्राची पोत व एक ग्रॅम सोन्याची पोत, असा एकूण 94 हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सतर्क नागरिक विशाल विसपुते व प्रदीप टाकसाळ यांनी दिलेली माहिती व सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या मदतीने पोलिसांनी तत्परतेने तपास करून घटनेनंतर अवघ्या एका तासाच्या आत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले. यावेळी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील श्रुती रोहित कटटी, वय 30 वर्षे, अर्चिता सिनु कटटी, वय 20, इंदु रामु कटटी, वय 25, अक्षता राजु कटटी, वय 20 या चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची अंगझडती घेवून पोलिसांनी चोरीस गेलेली सात ग्रॅम वजनाची सोन्याची मणी-मंगळसूत्राची पोत जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सोनुने, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया गोमलाडू व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी पार पाडली.आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. पोलीस आणि नागरिक यांच्या संयुक्त सहकार्याने गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घालता येतो, असे आवाहन पोलिसांनी केले.


