भांगशीमाता गडावरील ५ कोटींच्या सत्संग सभागृहाचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते, आमदार तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र भांगशी माता गड, शरणापूर येथे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य सत्संग सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. शिवसेना नेते, आमदार तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निधीतून या सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.
यावेळी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांनी अंबादास दानवे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना, दानवे हे समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर सत्तेबाहेर राहूनही समाजासाठी काम करता येते, असे सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पदाची इच्छा ठेवली नाही. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या वडिलांची परंपरा जपत मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली. आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्री असताना केलेले काम ही देवाची सेवा होती, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत आपण एकमेकांना आधार देणे, धीर देणे एवढेच आपल्या हातात आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्याला आधार देणे हीच खरी सेवा आहे. सेवा हाच सर्वांत मोठा धर्म आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना मानसिक बळ देणे ही आपली जबाबदारी आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आधाराचा एक भावनिक प्रसंगही सांगितला. मंदिराबाहेर एका ज्येष्ठ व्यक्तीने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याची विचारणा केली असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दिलेला शब्द ऐकून आपण कठीण काळातही जगण्याचा निर्णय घेतला, असे त्या व्यक्तीने सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
धर्माच्या संकल्पनेवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज धर्माची चर्चा वेगळ्याच वळणावर गेली आहे. आपण पंचमहाभूतांना विसरत चाललो आहोत. पृथ्वी आणि पर्यावरणाचे नुकसान करत असताना आपण खऱ्या अर्थाने धर्माचे पालन करतो आहोत का, याचा विचार करण्याची गरज आहे. धर्माचे पालन म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे, निसर्गाचा समतोल राखणे आणि समाजाची सेवा करणे होय.
याप्रसंगी शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हा संघटक सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर, अरविंद धिवर, संतोष जेजुरकर, तालूकाप्रमुख संजय मोटे, विष्णू जाधव, मनोज पेरे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, गणेश लोखंडे, प्रमोद ठेगडे, गिरीष चपळगावकर,बजरंग पाटील, पुरुषोत्तम पानपाट,दिनेशराजे भोसले, रामेश्वर कोरडे, राहुल सोनवणे, प्रतीक अंकुश,अक्षय साठे, हरीश पाटील, विशाल खंडागळे, नंदू लबडे, राजेंद्र दानवे, गणेश सुरे, नारायण मते, संदेश कवडे, नितीन पवार, दीपक तांबे, गौरव सोनवणे, आशा दातार, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, वैशाली कोरडे, मंगल डोंगरे, रंजना आहेर, अरुणा राऊत उपस्थित होते.


