dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

टवाळखोरांविरुद्ध पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन

महिला, विद्यार्थिनींची छेड काढणारे ग्रामीण पोलिसांच्या रडारवर

महिला, मुली आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या 32 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 3 व 4 ऑगस्टदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : महिला, मुली आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या 32 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 3 व 4 ऑगस्टदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके तसेच महिला व मुलींची वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घातली. महिला व विद्यार्थिनींची छेड काढणे, पाठलाग करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे आणि टवाळखोरी करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 110 व 117 अन्वये 32 जणांवर कारवाई करण्यात आली.

अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई

या विशेष मोहिमेत अवैध धंद्यांवरही मोठा प्रहार करण्यात आला. दारूबंदी कायद्याअंतर्गत अवैध मद्यविक्रीप्रकरणी 55 गुन्हे दाखल करून 57 आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, गावठी हातभट्टीची दारू, रसायने, ड्रम व इतर साहित्य असा सुमारे 3 लाख 92 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायद्यान्वये आठ प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आल्या.

शाळा परिसरात झाडाझडती

शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कोटपा (COTPA) कायद्यान्वये 58 गुन्हे दाखल करून 58 आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 19 हजार 647 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

4 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त

संपूर्ण मोहिमेत 113 गुन्हे, 147 आरोपींवर कारवाई आणि 4 लाख 12 हजार 327 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले असून, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top