Rumors hit! Crowd at pumps for fuel : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कोणतीही टंचाई नसतानाही अफवांमुळे इंधनाची मागणी अचानक वाढली असून पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.

वाशिम : अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्ष या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कोणतीही टंचाई नसतानाही अफवांमुळे इंधनाची मागणी अचानक वाढली असून पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.

गत दोन दिवसांपासून परिस्थिती अधिकच बिकट झाली असून गुरुवारीही वाशिम शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड उडालेली दिसली. मध्यवर्ती भागातील दोन पंपांवरील इंधनसाठा सकाळीच संपल्याने ते बंद ठेवावे लागले. परिणामी इतर पंपांवर वाहनांच्या रांगा वाढल्या. विशेष म्हणजे, गरज नसतानाही अनेक वाहनचालक टाक्या फुल करून घेत आहेत. काहींनी तर कॅन आणि बॉटल घेऊन इंधन साठवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, काही पेट्रोल पंप चालकांकडून नियमांचे उल्लंघन करून कॅन-बॉटलमध्ये इंधन देण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने वारंवार आवाहन करून जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले जात असतानाही मागणी आटोक्यात येत नाही. यामुळे साधारण चार ते पाच दिवस चालणारा साठा एका दिवसातच संपत असून पंप चालकांवर ताण वाढला आहे. शिवाय, पुरवठादार कंपन्यांकडून आगाऊ पेमेंटची अट घालण्यात येत असल्याने पंपचालकही अडचणीत सापडले आहेत.


