pledges posthumous body donation : नांद्राकोळी येथील काळवाघे दांपत्याला मृत्यूनंतरही जगण्याचे वरदान लाभले आहे. कारण, त्यांनी देहदानाचा संकल्प केलाय. ८५ वर्षीय निंबाजी काळवाघे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेत, यासंदर्भातील अर्ज आज २५ मार्च रोजी बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

बुलढाणा : होय! नांद्राकोळी येथील काळवाघे दांपत्याला मृत्यूनंतरही जगण्याचे वरदान लाभले आहे. कारण, त्यांनी देहदानाचा संकल्प केलाय. ८५ वर्षीय निंबाजी काळवाघे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेत, यासंदर्भातील अर्ज आज २५ मार्च रोजी बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
मृत्यूनंतर आपले संपूर्ण शरीर वैद्यकीय शिक्षण, संशोधन किंवा अवयव प्रत्यारोपणासाठी उपयोगात येईल, या भावनेतून काळवाघे दांपत्याने देहदानाचा संकल्प केला. त्यांच्या या निर्णयाचे वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता डॉ. झिने यांनी स्वागत केले. माणसाचे जीवन हे अनिश्चित आहे. त्यामुळे, आजच्या आधुनिक युगातही आपण परोपकार जोपासून इतरांच्या
कामी आलो पाहिजेत, असे सांगत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात आपला निर्णय उपयुक्त ठरेल, अशी भावना निंबाजी काळवाघे यांनी व्यक्त केली. मरणोत्तर देहदानाचा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डी. एस. लहाने आणि पत्रकार गणेश निकम उपस्थित होते.